"हा देश सर्वांचा आहे. सर्व धर्म- पंथ- सर्व भाषांचा आहे. हे वैविध्य हीच तर भारताची ताकद आहे." "This country belongs to all. All religions - creeds - all languages. This diversity is the strength of India."
"राज्यघटना शेवटी काय देईल? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल. पण, त्या राज्यघटनेत प्राण फुंकतील 'आम्ही भारताचे लोक", असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना सादर करताना सांगितले. आणि, त्याचवेळी हेही अधोरेखित केले, "हा देश सर्वांचा आहे. सर्व धर्म- पंथ- सर्व भाषांचा आहे. हे वैविध्य हीच तर भारताची ताकद आहे."
![]() |
मजा बघा.
ही गोष्ट तेव्हाची, जेव्हा बाबासाहेब कायदामंत्री होते.
ही घटना २८ जुलै १९५० ची. भारत नुकताच प्रजासत्ताक झाला होता. राज्यघटनेचे शिल्पकार असणारे बाबासाहेब कायदामंत्री होते.
बाबासाहेबांना औत्सुक्य होते, कोर्टात उर्दूतून काम कसे चालते, ते बघण्याचे.
त्यासाठी ते औरंगाबादला आले. जिल्हा सत्र न्यायालयात आले. आणि, आस्थेने त्यांनी उर्दूत चाललेला युक्तिवाद ऐकला. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात तेव्हा ॲड. शेखलाल पटेल आणि ॲड. दत्तोपंत देशपांडे यांनी अस्खलित ऊर्दूतून युक्तिवाद केला. पन्नास मिनिटे चाललेला हा युक्तिवाद बाबासाहेबांनी खूप मनापासून ऐकला. टिपणे काढली. न्या. चंद्रशेखर गोडसे तेव्हा जिल्हा न्यायाधीश होते. बाबासाहेबांनी सर्वांशी संवाद केला.
आज या घटनेला ७१ वर्षे पूर्ण झाली.
ॲड. शेखलाल यांचे पुत्र ॲड. कमरूद्दीन पटेल यांनी आज 'दिव्य मराठी'त या आठवणी जागवल्या आहेत. 'दिव्य मराठी'चे औरंगाबाद सिटी एडिटर श्रीकांत सराफ यांचे कमरूद्दीन हे मित्र. तर, ॲड. दत्तोपंत देशपांडे हे श्रीकांत यांचे आजतसासरे. त्यामुळे हे ऐतिहासिक तपशील सहजपणे मिळाले.
बाबासाहेबांची ही मुद्रा बघा.
किती आस्थेनं ऐकताहेत तो हा युक्तिवाद.
'वन नेशन, वन लॅंग्वेज'च्या धुमाकुळात ही सर्वसमावेशक, बहुआयामी मुद्रा किती आश्वासक वाटते.
ही मुद्रा आहे बाबासाहेबांची.
हीच मुद्रा आहे माझ्या भारताची.
ही मुद्रा आपल्याला जपायची आहे.
- संजय आवटे
#panthersrepublicanparty



Comments
Post a Comment