कमलताई गवई यावर्षीच्या RSS च्या शतकोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित राहणार आहेत अशी बातमी आहे. यात विशेष आश्चर्य वाटण्यासारखे असे काही नाही. त्या त्यांचे पती दिवंगत रामकृष्ण गवई यांचा वारसा चालवित आहेत. दिवंगत रामकृष्ण गवई चळवळीपेक्षा व्यक्तीगत स्नेहाला जास्त महत्व देणारे व्यक्तीमत्व होते. त्यामुळे त्यांनी चळवळीपेक्षा व्यक्तीगत संबंधाला अधिक महत्व दिले. परिणामत: त्यांच्या मित्र परिवारांचा विस्तार काँग्रेस पासून तर संघपरिवारापर्यंत झाला. त्याचा वारसा त्यांच्या पत्नी तसेच त्यांची मुले चालवित आहेत. याचा फायदाही गवई परिवाराला वेळोवेळी मिळतो आहे.
या निमित्ताने मी रामकृष्ण गवई यांच्या म्रृत्यूनंतर झालेल्या श्रध्दांजली सभेच्या निमित्ताने त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेणारा अग्रलेख लिहिलेला होता. तो पुन्हा पोस्ट करतो आहे.
............................................................
विकाऊ नेते समाजाचे आदर्श ठरु शकत नाहीत!
रिपब्लिकन पक्षाच्या एका गटाचे नेते दिवंगत रामकृष्ण गवई यांना सर्वपक्षीय आदरांजली वाहण्याचा कार्यकम नुकताच मुंबई येथे पार पडला. सद्या भाजपच्या जनानखाण्यात सामील असलेले रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱया एका गटाचे नेते रामदास आठवले यांनी हा कार्यकम आयोजित केलेला होता. या आदरांजली कार्यकमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँगेसचे नेते बाळासाहेब थोरात शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह भाजपाचे भालदार-चोपदार म्हणून वावरणारे महादेव जानकर, राजू शेट्टी इत्यादींसह विविध पक्षांचे लोक सामील होते. या कार्यकमात रामकृष्ण गवई कसे महान होते, याचे पोवाडे गायिले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर गवईंच्या कर्तृत्वाचे गोडवे गातांना गवई म्हणजे राजकारणातील अस्पृश्यता संपविणारे महापुरुष असे प्रशस्तिपत्र दिले. यासोबतच गवईंचे स्मारक सरकारी खर्चाने बांधण्याची घोषणा केली. दिवंगत रामकृष्ण गवई यांना सर्वपक्षीय आदरांजली वाहण्यासाठी कार्यकम आयोजित करणे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गाणे किंवा त्यांचे सरकारी खर्चाने स्मारक उभारणे याला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र आंबेडकरवादी राजकारणाचे तत्वज्ञान गुंडाळून ठेऊन स्वार्थ आणि लाचारीच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवणाऱया रामकृष्ण गवई यांना महान आंबेडकरवादी नेता म्हणून पोजेक्ट करण्याचा जो खटाटोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांसारख्या आंबेडकरविरोधी पक्षांच्या नेत्यांनी चालविला आहे, त्याचा आंबेडकरवादी जनतेने प्रखरपणे विरोध केला पाहिजे असे आमचे मत आहे.
रामकृष्ण गवई यांचा राजकारणातील उदय दादासाहेब गायकवाड यांच्या अवतीभवती वावरणारा कार्यकर्ता म्हणून झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पक्षांमधील एन.शिवराज, ऍड. बी.सी.कांबळे, ऍड. आर.डी.भंडारे, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, दत्ता कट्टी, बी.पी.मौर्य यांसारख्या उच्चशिक्षित नेत्यांमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरुन दुफळी माजली होती. यामध्ये दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाला जो विरोध करण्यात आला त्याचा मुख्य मुद्दा दादासाहेब गायकवाड हे उपरोक्त नेत्यांपेक्षा कमी शिक्षण असलेले आहेत, हा होता. या स्थितीत रामकृष्ण गवई यांच्यासारख्या सुशिक्षित तरुणाला दादासाहेब गायकवाडांनी जवळ केले. या जवळीकीचा फायदा उठवून त्यांनी आपले नेतृत्व रिपब्लिकन पक्षामध्ये स्थापित केले. दादासाहेब गायकवाडांना राज्यसभेवर पाठविण्यासाठी 1962 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना केवळ एका मताने निसटता विजय मिळाला. या विजयाचे श्रेय आपलेच आहे, असा देखावा करुन त्यांनी दादासाहेब गायकवाडांची खास मर्जी संपादन केली. या कामगिरीचे बक्षीस म्हणून रिपब्लिकन पक्षातील सर्व ज्येष्ठ आणि उच्चविद्याविभुषीत नेत्यांना डावलून रामकृष्ण गवई यांना 1964 साली काँग्रेसच्या सहाय्याने विधानपरिषदेवर सदस्य म्हणून घेण्यात आले. रिपब्लिकन पक्षामधील विश्वासघाताचा, धोकेबाजीचा, लाचारीचा आणि व्यक्तीगत स्वार्थासाठी चळवळीला गहाण टाकण्याचा प्रारंभ या घटनेपासून झालेला आहे. 1964 साली काँग्रेसच्या सहाय्याने विधानपरिषदेचे सदस्यपद मिळविलेल्या रामकृष्ण गवई यांनी त्यानंतर काँग्रेसची साथ कधीही सोडली नाही. काँग्रेसच्या सहाय्याने विधानपरिषदेचे उपसभापती, सभापती, विरोधी पक्षनेते, राज्यसभेचे खासदार, राज्यपाल अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. या संपूर्ण काळात त्यांनी रिपब्लिकन पक्ष म्हणजे काँग्रेसची एक शाखा या पद्धतीने रिपब्लिकन चळवळीला गलितगात्र केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून चळवळ बांधणाऱया बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, बाबू हरिदास आवळे, दत्ता कट्टी, हरिहरराव सोनुले यासारख्या नेत्यांचा अपमान आणि उपमर्द करण्याची एकही संधी गवईंनी सोडली नाही. रिपब्लिकन राजकारणामध्ये पोटजातीच्या आधारावर समाजामध्ये फुट पाडण्याचे दुष्कर्म रामकृष्ण गवई यांनीच सुरु केले. आंबेडकरी समाजाच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचे वेळोवेळी होणारे प्रयत्न रामकृष्ण गवई यांनी एखादे क्षुल्लकसे कारण पुढे करुन हाणून पाडले, हा इतिहास आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱयांनी मिळविलेल्या सार्वजनिक मालमत्तांवर आपला वैयक्तिक कब्जा करण्याच्या स्वार्थी प्रवृत्तीचे श्रेयही रामकृष्ण गवई यांनाच जाते. धम्मक्रांतीचे परमपवित्र स्थान असलेल्या दीक्षाभूमीला गवई यांनी आपल्या राजकारणाचा अड्डा आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन बनविले. या भूमिवर वास्तव्य करुन असलेल्या जागतिक किर्तीच्या डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांना अपमानित करुन हाकलून लावण्याचे धम्मविरोधी कृत्य गवई यांनीच केले. बिहारचे राज्यपाल असताना बोधगया येथील महाबोधी विहारावरील हिंदुंचा कब्जा समाप्त करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना त्यांनीच हाणून पाडले. गवई यांची एकंदरीत राजकीय व सामाजिक कारकीर्द पाहिल्यास स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबियांचे आर्थिक कल्याण करण्याव्यतिरिक्त कोणतेही योगदान त्यांनी चळवळीला दिल्याचे दिसत नाही. या स्थितीत त्यांना आंबेडकरवादी चळवळीतील महान नेता म्हणून आंबेडकरी जनतेवर थोपण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत त्यामागचा हेतू लाचारी आणि स्वार्थी प्रवृत्तीला महानता मिळवून देणे याशिवाय दुसरा कोणताही दिसत नाही.
रामकृष्ण गवई हे चळवळीपेक्षा व्यक्तीगत स्नेहाला जास्त महत्व देणारे व्यक्तीमत्व होते. त्यामुळे त्यांनी चळवळीपेक्षा व्यक्तीगत संबंधाला अधिक महत्व दिले. परिणामत: त्यांच्या मित्र परिवारांचा विस्तार काँग्रेस पासून तर संघपरिवारापर्यंत झाला. जे नेते आपल्या समाजाच्या हिताचा बळी देऊन व्यक्तीगत स्वार्थ साधण्यास तयार होतात त्यांचे प्रस्थापित पक्षांकडून नेहमी स्वागतच होते. जे नेते स्वाभिमान आणि संघर्ष याचा त्याग करुन लाचारी आणि गुलामी स्विकारतात त्यांचे गुणगान करण्यास सत्ताधारी नेहमीच तयार असतात. मात्र समाजात त्यांना फारसे स्थान नसते. आपल्या पोटासाठी आणि आपल्या कुटूंबाच्या भल्यासाठी जे आपली अस्मिता, आपली इज्जत आणि आपला स्वाभिमान विकून टाकतात त्यांच्यामध्ये आणि देहविक्रय करुन आपले कुटूंब चालविणाऱ्या वारांगणेमध्ये कोणताही फरक नसतो. कोणताही भेदभाव न करता कोठ्यावर येणाऱ्या ग्राहकाचे स्वागत करणाऱ्या वारांगणेचे अनेक चाहते निर्माण होतात. आंबेडकरी समाजामध्ये चळवळीचा बाजार मांडणारे असे अनेक नेते निर्माण झाले आहेत. अशा नेत्यांना काँग्रेसवाले, भाजपवाले, एनसीपीवाले आणि इतर पक्षातील असेच विकाऊ असलेले भालदार - चोपदार महान नेता म्हणून गौरवित असतात. याचा अर्थ हे विकाऊ नेते म्हणजे चळवळीचे राखणदार, चळवळीचे मानबिंदू आणि सामाजिक आदर्श ठरु शकत नाही. हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
मुळात गवई असो किंवा रिपब्लिकन पक्ष नेत्यांच्या नावाने काँग्रेस,भाजप या पक्षांनी खपविलेल्या रामदास आठवले, प्रा.जोगेंद्र कवाडे वा अन्य लहान-मोठे नेते असो, अशा हस्तकांना आंबेडकरी समाजाने कधीही आपला नेता म्हणून स्विकारले नाही. उलट त्यांचा पदोपदी अपमान, तिरस्कार करुन समाजातून बहिष्कृत ठेवण्याचा प्रयत्न आवर्जून केला. कारण अशा बाजारु नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळ संपुष्टात आली आहे. रामकृष्ण गवई म्हणजे आंबेडकरी समाजाच्या लाचारीचे आणि गुलामीचे प्रतिक आहे. अश्या गुलाम आणि लाचार प्रवृत्तीचा उदोउदो करण्यामुळे समाजापुढे चुकीचे आदर्श उभे राहतात. म्हणून एखादा व्यक्ती व्यक्तीगत पातळीवर कीतीही यशस्वी अथवा धनवान असला तरी सामाजिक पातळीवरील त्याचे मूल्यमापन त्याने समाजापुढे कोणता आदर्श उभा केला यावरुन झाले पाहिजे. या कसोटीवर रा.सु. गवई हे आंबेडकरी चळवळीचे आणि समाजाचे आदर्श नेते ठरु शकत नाही.
सुनील खोबरागडे

Comments
Post a Comment