अनिकेत भाई संसारे यांचे पित्यास निरोप पत्र

 प्रति,

भिमरत्न पँथर मा.मनोजभाई संसारे

पक्षप्रमुख 

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष 


        स्वाभिमानी जय भीम भाई, मी तुमचा एक छोटासा कार्यकर्ता. मी हे पत्र तुम्हाला मुलगा म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून लिहीत आहे.

        भाई १२मे २०२३ रोजी तुम्ही जगाचा निरोप घेतला आणि आम्हा सर्वांना पोरक केलं. खरंतर तुम्ही आमच्यात नाहीत हे आज देखील मनाला पटत नाही, कारण ज्या प्रकारे तुम्ही भाषण करायचे,ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन करायचे, तुमचं देखणं आणि रुबाबदार दिसणं तुमचा तो पहाडी सिंहा सारखा आवाज आंबेडकरी चळवळ कधीच विसरू शकणार नाही. भाई तुम्ही वेगळे होता. कोरबा मिठागर सारख्या एका छोट्याशा झोपडपट्टीतून निघून एखादा तरुण आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करतो ही साधारण बाब नाही. भाई तुम्ही आधी औरंगाबादला होता तिथे सुद्धा आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय होता. मग मुंबईला येऊन पँथर भाई संगारे,नामदेव दसाल, राजा ढाले यांच्यासारख्या विद्रोही ज्वलंत नेत्यांच्या तालमीत आंबेडकरी चळवळीत सक्रिय झालात. आंबेडकरी चळवळीतील आंदोलन असो किंवा मोर्चा असो तुम्ही नेहमी सक्रिय असायचे. आंबेडकरी चळवळीत काम करत असताना तुम्ही फार संकटांना सामोरे गेले. फार मोठी दुःख सुद्धा तुमच्या वाटेला आली तरी तुम्ही खचले नाही आणि तुमचा हाच लढवय्यपणा २००२ साली तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये घेऊन गेला. त्यानंतर तुम्ही २०१२ साली सुद्धा अपक्षांचे गटनेते झालात. हे कुठल्याही येड्या गबाळ्याचं काम नाही. भाई तुम्ही खरंच भीमरत्न होता. तुम्ही केलेली बुद्धिस्ट फेस्टिवल असो किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला शिवाजी पार्कचा तुमचा महाभोजन दानाचा कार्यक्रम असो, त्याची बरोबरी आज पण कुठलाही आमदार किंवा खासदार करू शकत नाही ही तुमच्या कार्यक्रमाची भव्यता होती. २०१२ साली तुम्ही नागपूर दीक्षाभूमी ते दादर चैत्यभूमी अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अस्थी कलश यात्रा महाराष्ट्रात काढली. यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्तितचे दर्शन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला करून दिले आणि २०१२ साली जन्माला आला तो म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष. तुम्ही पक्षाच्या कुठल्याही पदावर नसताना देखील तुम्ही या पक्षाची संपूर्ण जबाबदारी एकट्याच्या खांद्यावरती उचलली. खरंतर पदापेक्षा व्यक्ती मोठा असतो हे मी तुमच्याकडे बघूनच शिकलो. "माझी मान कापली तरी चालेल पण आंबेडकरी विचारांची गद्दारी मी करणार नाही" हा मूळ मंत्र सुद्धा तुमच्याच मुखातून ऐकला.

"बोले तैसा चाले" असा आंबेडकरी चळवळी मधला तुम्ही एकमेव आवाज होता. तुम्ही फक्त आंबेडकरी चळवळीचे नेते नव्हता तर तुम्ही आम्हा समस्त तरुणांसाठी एक प्रेरणा होता, कलाकारांसाठी त्यांचा आधारस्तंभ होता,शोषित पीडित कामगारांचा आवाज होता, कितीतरी लोकांचे आयुष्य घडवणारे शिल्पकार होता. आज २०२३ चा शेवटचा दिवस. उद्या १ जनवरी २०२४ म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. पूर्ण जगजरी २०२४चं स्वागत उत्साहात करत असलं तरी सुद्धा या नवीन वर्षामध्ये तुम्ही माझ्यासोबत नाही हा विचारच मुळात अंगावर शहरा आणणार आहे. मी दर नवीन वर्षाला रात्री न चुकता तुमच्या पाया पडून तुमचा आशिर्वाद घ्यायचो. मात्र यंदा त्या पायांचा स्पर्श माझ्या हाताला होणार नाही. खरंतर तुमच्याशी भरपूर काय बोलावसं वाटतं, पण एका पत्रात ते शक्य नाही.

म्हणून या नवीन वर्षात पदार्पण करत असताना,तुमचा मुलगा या नात्याने नव्हे तर तुमच्या तालमीत तयार झालेल्या एक छोट्याशा कार्यकर्त्याचं हे तुम्हाला वचन आहे कि मी तुमच्या आंबेडकरी विचारधारेला कधीही तडा जाऊ देणार नाही. कितीही संकट माझ्यावरती,आपल्या कुटुंबावरती किंवा आपल्या पक्षावर ती आली तरी त्याचा सामना मी निधड्या छातीने करेल हे माझं तुम्हाला वचन आहे.

 तुम्ही जरी या जगात देहरूपी नसला तरीसुद्धा तुमचा हा स्वाभिमानी भिमरथ असाच पुढे जात राहील.

तुमचा आशीर्वाद हा सदैव आम्हा सर्वांवरती असावा हीच तथागत भगवान गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करतो 🙏


तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता 

अनिकेत मनोजभाई संसारे

Comments