■ राजाराम पिराजी ढाले ■ Raja Dhale

 

 ■ राजाराम पिराजी ढाले ■

(३० सप्टेंबर १९४० – १६ जुलै २०१९)


राजा ढाले हे आंबेडकरी चळवळीतील एक नेते, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथरचे आक्रमक नेते होते, ही संघटना ज.वि. पवार, अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांनी स्थापन केली होती. त्याअगोदर ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते. त्यांनी फुले-आंबेडकरी विचाराचा पुरस्कार केला.


राजा ढालेंचा जन्म ३० सप्टेंबर १९४० रोजी सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावी झाला. ते तरूण असतानाच त्यांच्या आईवडीलांचे निधन झाले. त्यांनी सुरुवातीला 'प्रबुद्ध भारत'मध्ये लिखाण केले. पॅंथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. साहित्यिक भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, ज.वि. पवार, सतीश काळसेकर यांच्यासह त्यांनी 'लिटल मॅगेझिन'ची चळवळ सुरू केली होती. राज्यात ठिकठिकाणी दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांनी अमेरिकी कृष्णवर्णीय 'ब्लॅक पॅंथर' संघटनेच्या धर्तीवर 'दलित पॅंथर' ही लढाऊ सामाजिक संघटना स्थापन केली. ते पॅंथरचे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पॅंथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. कालांतराने 'दलित पॅंथर' बरखास्त झाली. मास मूव्हमेंट, सम्यक क्रांती संघटना आदींचे ते संस्थापक सदस्य होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९९९ साली ईशान्य मुंबईतून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.


"एका दलित महिलेला विवस्त्र करून तिला अर्धा कि.मी. धावायला लावले. या गुन्ह्याची गुन्हेगाराला ५० रुपये दंडाची शिक्षा झाली. मात्र राष्ट्रध्वजाची अवमानना करणाऱ्याला ३५० रुपये दंड झाला. म्हणजे आयाबहिणींच्या वस्त्राची किंमत राष्ट्रध्वजापेक्षा कमी आहे. मग त्याचे (राष्ट्रध्वजाचं) काय करायचे?" असा सवाल करून मोठा गहजब राजा ढालेंनी निर्माण केला होता. भारतीय स्वातंत्र्यालाच प्रश्न करणारा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख त्यांनी लिहिला होता.


ढाले शुद्ध बौद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होते. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा ते प्रखर पुरस्कार करू लागले. त्यांनी 'दलित साहित्या'चा 'आंबेडकरवादी साहित्य' असा शब्द प्रयोग सुरू केला. ते नेता, मार्गदर्शक आणि आंबेडकरवादी चळवळीचा भाष्यकारही होते. तसेच ते चित्रकार आणि कवीही होते. त्याचे वाचन दांडगे होते. त्यांच्याकडे पुस्तकाचा मोठा संग्रह होता. पॅंथरनंतर दिशाहिन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. राजा ढालेंचा झेन, महानुभाव आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता.



राजा ढाले यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मानाने गौरवण्यात आले आहे. यांच्यावर 'खेळ' या नियतकालिकाचा विशेषांक प्रकाशित झालेला आहे.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेचा पुरस्कार (१-१०-२०१५),

मिलिंद समता पुरस्कार, मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत.


तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघुअनियतकालिके आज उपलब्ध नाहीत. या अनियतकालिकांत राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले होते. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादने हे सारे साहित्य विखुरलेले आहे. ढालेंच्या आयुष्याचे तपशील फारसे उपलब्ध नाहीत. स्वतः ढालेंनीही हे निगुतीने जपण्याचा आणि प्रस्थापित होण्याचा खटाटोप केलेला नाही.


राजा ढाले यांना जाऊन आज पाच वर्ष झाले त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तीमत्वाचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न...




Comments